"बेरोजगारांची मानसिकता व सरकारी मनमानी कारभार"
"कंत्राटी भरती सारखे जाचक निर्णय घेवून सुद्धा सर्व सामान्य लोक, बेरोजगार मंडळी सरकारच्या विरोधात काहीही बोलायला तयार नाही. का?तर म्हणे! आज कमवले तरच आपले घर चालते म्हणे! परंतु आपले पुढील आयुष्य तसेच आपल्या पिढ्यांचे भवितव्य आपण अंधारात ढकलत आहोत याकडे कुणाचेच लक्ष नाही."
आंदोलन वगैरे हे काही सांगु नका सर...आम्ही झोपलोय झोपू द्या.आम्ही घर कोंबडे.आम्हाला खुराड्यातच रहायची सवय आहे. आज आमचे पोट भरले बास झाले.कोणी या आणि आमचा बळी घ्या.आम्ही माना टाकलेल्या आहेत कोणी ही येऊन कापा. जेव्हढा मनमानी कारभार चालतोय चालू द्या.जेव्हढे अन्याय कारक निर्णय सरकारला घ्यायचे घेऊ द्या.आम्हाला आज त्रास नाही आणि आमचे आजचे भागले बास झाले. भावी पिढ्यांचे शोषण व्हायचे तर होऊ द्या. देश पुन्हा मूठभर लोकांचा गुलाम होणार असेल तर होऊ द्या.आम्हाला आज जगुन घ्यायचे.आमच्या गप्प राहण्याने आम्ही जर भावी पिढ्यांच्या,देशाच्या पारतंत्र्याचे कारण बनुन दोषी ठरणार आहोत तर ठरु द्या.लढणारे लढतील नाहीतर मरतील पण आम्हाला आयते कटोऱ्यात जे पडेल ते घ्यायची नाहीतर अन्याय गिळायची सवय लागली आहे.मुळात आमच्या धमन्यांमध्ये वाहते रक्त थंड पडले आहे,आमच्या नसा ढिल्या पडल्या आहेत आणि आमची हाडं खिळखिळी झाली आहेत.त्यामुळे जुलुमा विरोधात मान ताठ ठेवून दोन हात करण्याचा दम आमच्या छाताडात नाही.खरं सांगायचं म्हणजे झोपलेला अवाज दिल्या ने उठू शकतो पण मुडदा कधीच उठत नाही. जीवंत माणूस स्वतः पेटून उठतो, अन्यायाला पुरून उरतो परंतु मुडद्याला पेटून द्यावे लागते किंवा गाडावे लागते. कोणीही या आणि आमचे ताट उचलून न्या.आम्हाला काहीच फरक पडणार नाही.
पण एक दिवस रस्त्यांवर येण्या पेक्षा एक दिवस रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर काय हरकत आहे रस्त्यावर यायला. नसेल जमत तर किमान रस्त्यावर उतरणाऱ्यांना पाठबळ द्यायला तरी काय हरकत आहे.
आम्ही निवडणुका असताना तोंड उघडत नाही,आम्ही सरकारने चुकीचे धोरण आणले तरी तोंड उघडत नाही.
नवीन कायदे आले तरी तोंड उघडत नाही.भ्रष्टाचार होत असेल तरी तोंड उघडत नाही.अन्याय,अत्याचार होत असेल तरी तोंड उघडत नाही.
शिक्षित,कळत्या लोकांनीच जर लोकांना साधं जागृत करण्यासाठी पण तोंड उघडायचे नाही मग काय अर्थ आपल्या शिक्षित पणाला? जो पर्यंत अन्यायाचे चटके आपल्याला, आपल्या नातेवाईकांना बसत नाही तो पर्यंत आपल्याला देशाशी काहीच देणे घेणे नाही. याच वृत्तीमुळे आपल्याला सुरूवातीला मुगलांनी व नंतर इंग्रजांनी गुलाम केले आणि त्याचे परिणाम पुढील बऱ्याच पिढ्यांनी भोगले.त्या क्रुर लोकांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी,स्वातंत्र्ययोद्यांनी जे केले तेव्हा त्यांनी जर असाच विचार केला असता. असेच गप्प राहिले असते तर...?
आपल्या देशावाशीयांनी गुलामगिरीत जे भोगलं ते भविष्यात पुन्हा भोगावे लागु नये म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी व सहकाऱ्यांनी राज्यघटना निर्माण केली त्यामुळेच आपण देशात हवं तेथे वास्तव्य करु शकतो आणि हवा तो व्यवसाय करू शकतो.
आपल्या गप्प राहण्यामुळे कायद्यात पळवाटा काढून बचाव करणाऱ्या याच लोकांनी त्यांच्या जमवलेल्या अडमाप संपत्तीचा उपयोग करून जर दडपशाही चे धोरण सुरू केले, कोर्ट सुद्धा नियंत्रणात आणले,सर्वत्र खाजगीकरण केले एव्हढेच नव्हे तर संविधान बदलून कठोर, क्रुर वागणूक देणारा कायदा आणला तर....
कंत्राटी नौकरी तर सोडाच, व्यवसाय करणे सोडाच पण आपल्या कष्टाची भाकर सुद्धा सुखाने खाता येणार नाही. पण आपण काहीच बोलायचे नाही.
"येऊ घातलेले भयानक संकट ओळखा बंधू भगिनींनो जागे व्हा! एकत्र येऊन क्रांती केल्याशिवाय पर्याय नाही."
- गजानन बहिवाळ
Comments
Post a Comment